चेन्नई - अभिनेत्री ते राजकीय नेते असा प्रवास केलेल्या तामिळनाडूतीलकाँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सन 2014 पासून त्या काँग्रेस नेता बनून काम करत असून काही दिवसांपूर्वीच भाजपा प्रवेशाचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असून त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.
खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तामिळनाडूत 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. त्यातच, खुशबू सुंदर यांच्या रुपाने दक्षिणच्या राजकीय मैदानात भाजपा जोमाने उतरण्यासाठी उत्सुक आहे. दोन दिवसांपूर्वीचं त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खुशबू यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात एंट्री करताना सर्वप्रथम 2010 साली त्यांनी डीएमके पक्षात प्रवेश केला होता, त्यावेळी डीएमके सत्ताधारी पक्ष होता. मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असून जनसेवा करायला मला आवडतं, माझा निर्णय योग्य असल्याचे खुशबू यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र, 4 वर्षानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे, असेही खुशबू यांनी म्हटले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खुशबू यांना काँग्रसने तिकीट नाकारले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे, खुशबू आता भाजपाचे कमळ हाती घेणार का? याकडे तामिळनाडूतील बड्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ट्विटरवरही खुशबू सुंदर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.