Congress: काँग्रेसचा अजून एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर? ४ ऑगस्टला पक्षप्रवेश, ट्विट करत दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:08 PM2022-08-02T15:08:01+5:302022-08-02T15:08:53+5:30
Kuldeep Bishnoi: राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कुलदीप बिश्नोई यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत. शायराना अंदाजामध्ये ट्विट करत कुलदीप बिश्नोई यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.
चंडीगड - सततच्या पराभवांमुळे गलितगात्र होत चाललेल्या काँग्रेसला हरियाणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कुलदीप बिश्नोई यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत. शायराना अंदाजामध्ये ट्विट करत कुलदीप बिश्नोई यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. घायल तो यहां हर परिंदा है, मगर जो फिर से उड सका वही जिंदा है, असे ट्विट कुलदीप बिश्नोई यांनी केलं आहे.
दरम्यान, कुलदीप बिश्नोई याँनी अजून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की ४ ऑगस्ट रोजी १० वाजून १० मिनिटे, या ट्विटनंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपा जॉईन करणार का? अशी विचारणा केली. मात्र कुलदीप बिश्नोई यांच्या ट्विटवरून केवळ शक्यता वर्तवल्या जात आहेत. तसेच कुलदीप बिश्नोई हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार हेही निश्चित आहे. कुलदीप बिश्नोई यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचीही भेट घेतली आहे.
कुलदीप बिश्नोई यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडत हरियाणा जनहित काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांचे ७ आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी ५ जण पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. कुलदीप बिश्नोई आणि त्यांची पत्नी रेणुका बिश्नोई असे दोनच आमदार त्यांच्याकडे राहिले.
त्यानंतर २०१४ मध्ये कुलदीप बिश्नोई यांच्या पक्षाने भाजपासोबत आघाडी करत लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपाने ८ तर बिश्नोई दोन जागांवर लढले. मात्र बिश्नोई यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तर भाजपाने ७ जागा जिंकल्या. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपाने जागा न दिल्याने ही आघाडी तुटली. त्यानंतर कुलदीप बिश्नोई यांनी आपला पक्ष भाजपात विलीन करून टाकला होता.