महाबळेश्वर : संसदेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हे मित्र रायन बनाजी (वय ३५) यांच्या अंत्यविधीसाठी महाबळेश्वर येथे आले होते. मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते बनाजी यांच्या बंगल्यातच थांबले होते. त्यानंतर बनाजी यांच्यावर पारशी स्मशानभूमीत खा. राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दफन क्रिया पार पडली. सर्व सोपस्कार उरकूनच राहुल गांधी यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.मुंबई येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. बनाजी यांनी २० ते २२ वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या डोळ्यांवर उपचार केले होते. तेव्हापासून गांधी व बनाजी कुटुंबीयांमधील संबंध अधिकच दृढ झाले होते. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे वास्तव्यास होते. ते नियमित जिमला जात होते. काही दिवसांपूर्वी जीममध्ये व्यायाम करीत असताना रायन बनाजी यांना हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांचे निधन झाले. रायन यांनी निधनापूर्वी आपला अंत्यविधी महाबळेश्वर येथे व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.दुपारी बारा वाजता रायन बनाजी यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेतून पारशी स्मशानभूमीकडे हलविण्यात आले. खा राहुल गांधी हे स्वतः पार्थिवाबरोबर त्या रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत गेले. त्याठिकाणी पारशी समाजाच्या रीतीरिवाजाप्रामणे रायन बनाजी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार करण्यात आले.महाबळेश्वरमध्ये समाजाचे वास्तव्यब्रिटिश काळापासूनच पारशी समाजाचे लोक येथे वास्तव्याला होते. ब्रिटिश काळापासूनच पारशी समाजाची येथे स्मशानभूमी आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी एक विहीर आणि गिधाडं येथे होती, अशी माहिती दिली जाते. आता मात्र पारशी समाजाची लोकसंख्या खूप कमी झाली आहे. काही बोटांवर मोजण्या इतपत पारशी कुटुंबे येथे आहेत. या समाजाची लोकसंख्या कमी झाल्याने गिधाडं नष्ट झाली. गिधाडं नसल्याने आता येथे पारशी समाजाच्या वतीने दफन विधी पार पडतो. रायन बनाजी यांचेवर देखील दफन क्रिया पार पडली.
मित्राच्या अंत्यविधीसाठी राहुल गांधी आले होते महाबळेश्वरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:55 IST