७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:44 PM2024-07-01T17:44:11+5:302024-07-01T17:45:41+5:30
राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे.
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संविधान, महागाई आणि अग्निवीर योजनेवरून हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधी यांनी नीट पेपर लीकवरूनही निशाणा साधला. सरकार पेपरफुटी थांबवू शकले नाही आणि सात वर्षात ७० वेळा पेपर फुटले, असे म्हणत सरकारने नीटला व्यवसायिक परीक्षा बनवल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे. तुम्ही प्रोफेशनल स्कीमचे कमर्शियल स्कीममध्ये रूपांतर केले आहे. नीट ही श्रीमंत मुलांसाठी करण्यात आली आहे. सरकारने प्रोफेशनल परीक्षा ही कमर्शियल परीक्षा केली आहे. विद्यार्थी ६ महिने नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही.
दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभेत या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटले की, हिंदुस्तानने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असे म्हटले.
भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात, ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटले आहे की, सत्याची साथ द्या, असे राहुल गांधी म्हणाले. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला.
नीटवर सभागृहात एक दिवस चर्चा व्हायला हवी : राहुल गांधी
नीट परीक्षेतील अनियमिततेवर सभागृहात चर्चेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला वाटते की, नीट मुद्द्यावर एक दिवसीय चर्चा व्हायला हवी. गेल्या सात वर्षांत ७० वेळा पेपर फुटले आहेत. संसदेतून देशाला संदेश दिला जातो. आम्ही विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, नीटचा मुद्दा संसदेसाठी किती महत्त्वाचा आहे."