काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज भाजपशासित कर्नाटक राज्यात तिसरा दिवस होता. राहुल गांधी यांनी आज (रविवार) येथील नंजनगुड येथील प्रसिद्ध आणि प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर, सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केले. यावेळी मधेच जबरदस्त पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. नंतर त्यांनी पाऊस सुरू असतानाच पक्ष कार्यकर्त्यांची भेटही घेतली. भरपावसातील राहुल गांधी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्ये सोशल मीडियावर जबरदस्त शेअर करत आहेत.
संबंधित व्हिडिओमध्ये राहुल गांधी भरपावसात रॅलीला संबोधित करताना दिसत आहेत. ते म्हणाले, "भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. नदी प्रमाणे ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालेल. या नदीत आपल्याला हिंसा, द्वेष दिसणार नाही. येथे केवळ प्रेम आणि बंधुभाव दिसेल. ही यात्रा थांबणार नाही. आता बघा, पाऊस येत आहे, पावसानेही यात्रा रोखली नाही. उन आणि वादळदेखील ही यात्रा रोखणार नाहीत. या यात्रेचा उद्देश, भाजप आणि आरएसएस, जे देशात द्वेश पसरवण्याचे काम करत आहेत, त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा आहे."
याच बरोबर राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरही व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हडिओसोबत त्यांनी, "भारत को एकजुट करने से, हमें कोई नहीं रोक सकता. भारत की आवाज उठाने से, हमें कोई नहीं रोक सकता. कन्याकुमारी से कश्मीर तक जाएगी, भारत जोडो यात्रा को कोई नहीं रोक सकता," असे म्हटले आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. येथे त्यांनी खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट दिली. 1927 आणि 1932 मध्ये महात्मा गांधी यांनीही या ठिकाणी भेट दिली होती. यावेळी, स्वातंत्र्य सेनानीची हत्या करणाऱ्या विचारधारेने गेल्या आठ वर्षांत विषमता आणि विभाजनाला जन्म दिला आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.