“राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा करतात, पण पक्षात न्याय नाही”; काँग्रेसचे दोन नेते भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 02:05 PM2024-02-27T14:05:11+5:302024-02-27T14:07:23+5:30
Gujarat Congress Vs BJP: महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशनंतर आता गुजरातमधील दोन बड्या काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला.
Gujarat Congress Vs BJP:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा करत आहेत. राहुल गांधी यांची ही यात्रा उत्तर प्रदेशात आहे. मात्र, लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेशनंतर आता गुजरातमधील दोन बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे बडे नेते नारायण राठवा आणि त्यांचे पुत्र संग्राम सिंह राठवा यांना भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा सदस्य आणि माजी रेल्वेमंत्री असलेल्या नारायण राठवा यांचा भाजपामध्ये झालेला प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. नारायण राठवा यांचे राज्यसभा सदस्यत्व समाप्त होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गांधीनगर येथील भाजपा कार्यालयात पिता-पुत्रांनी पक्षात प्रवेश केला.
संग्राम सिंह राठवा यांची काँग्रेसवर टीका
पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहण्यास असमर्थ ठरतो. याचे कारण म्हणजे पक्षातील निर्णयक्षमता कमी झालेली आहे. राहुल गांधी देशभर भारत जोडो न्याय यात्रा करत फिरतात पण पक्षात कोणताही न्याय मिळत नाही. पक्षातील शिक्षित युवकांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही. काँग्रेस पक्षात युवकांची संख्या चांगली असून, तो पक्षासाठी मजबूत आधार आहे. मात्र, पक्षाकडून प्रेरणादायी समर्थन मिळाले नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता, अशी प्रतिक्रिया संग्राम सिंह राठवा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलताना दिली.
दरम्यान, राठवा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण व्हायचा आहे. तरीही त्यांनी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी १० हजार ५०० कार्यकर्ते भाजपामध्ये आले. ही खूप मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सीआर पाटील यांनी दिली.