पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला 'INDIA' असे नाव देण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे. मंगळवारी बंगळुरू येथे विरोधकांनी बैठक घेत आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. विरोधकांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील 'INDIA'ला मतदान करण्याचे आवाहन करताना भाजपा सरकारवर टीका केली.
"लोकशाहीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, लोकांच्या सत्तेच्या नावाखाली हुकूमशहा म्हणून राज्य करणाऱ्यांनी देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या एजन्सींना गुलाम बनवत राहिल्यास संवैधानिक मूल्ये नष्ट होतील. 'महाभारत' ही चांगली आणि वाईट यांच्यातील लढाई होती. ही लोकशाहीवादी आणि लोकशाहीविरोधी यांच्यातील लढाई आहे. क्षुल्लक स्वार्थी लाभ विसरण्याची वेळ आली आहे. स्वार्थी राजकारणाचा त्याग करून 'सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष'च्या सक्षमीकरणासाठी कार्य करायला हवे. भारताचे लोकशाही प्रजासत्ताक हे आमच्या पूर्वजांनी दिलेली देणगी आहे", अशा शब्दांत नवज्योतसिंग सिद्धूंनी सरकारला लक्ष्य केले.
तसेच भारतीय राष्ट्रीय विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (Indian National Developmental Inclusive Alliance) हा आवाज आहे, जो आपल्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करेल आणि लोकांच्या प्रश्नांसाठी लढेल. भारतातील जनतेकडे आता एक पर्याय आहे. इंडिया या आघाडीला मतदान म्हणजे हुकूमशाही राजवटीच्या विरोधात मतदान असून लोकशाही वाचवणाऱ्यांना मतदान करा, असे आवाहन सिंद्धूंनी केले.
विरोधी आघाडीच्या INDIA चा अर्थ काय?
- I - भारतीय (Indian)
- N - राष्ट्रीय (National)
- D - विकासात्मक (Developmental)
- I - सर्वसमावेशक (Inclusive)
- A - आघाडी (Alliance)
- आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली अन् INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मांडला होता. खरं तर विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.