कारागृहातील डाळ-पोळी खाण्यास नवज्योत सिंग सिद्धूंचा नकार, न्यावं लागलं रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 01:12 PM2022-05-23T13:12:16+5:302022-05-23T13:13:41+5:30
Navjot Singh Sidhu : महत्वाचे म्हणजे, कारागृह प्रशासनाने मेडिकल बोर्ड तयार केले असून, हेच सिद्धूंसाठी डायट प्लॅन तयार करेल. खरे तर, आपल्याला गव्हाची अॅलर्जी असल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे.
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सध्या पटियाला कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना ३३ वर्षांपूर्वीच्या रोड रेज केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यातच, सिद्धू यांनी कारागृहातील डाळ-पोळी खाण्यास अथवा भोजन घेण्यास नकार दिला आहे. आता त्यांना पटियाला येथील राजेंद्र हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. येथे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे, कारागृह प्रशासनाने मेडिकल बोर्ड तयार केले असून, हेच सिद्धूंसाठी डायट प्लॅन तयार करेल. खरे तर, आपल्याला गव्हाची अॅलर्जी असल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे. यामुळे त्यांनी कारागृहातील भोजन घेण्यास नकार दिला आहे. ते येथे केवळ सलाड खाऊनच दिवस काढत आहेत.
सिद्धू यांनी केली स्पेशल डायटची मागणी -
सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे. त्यांना लिव्हरची समस्या आहे. यामुळेच सिद्धू यांनी जेल प्रशासनाकडे स्पेशल डायटची मागणी केली आहे. सिद्धू यांचे वैद्यकीय सल्लागार सुरिंदर डल्ला म्हणाले, सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे. ते गव्हाची पोळी खाऊ शकत नाहीत. ते बऱ्याच दिसांपासून गव्हाची पोळी खात नाहीत. यामुळे त्यांनी स्पेशल डायटची मागणी केली आहे. यासंदर्भात, त्यांनी मेडिकल करतानाही माहिती दिली होती. न्यायालयाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून दुपारी ४ वाजेपर्यंत अहवाल मागवला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं ठोठावली एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा -
१९८८ मध्ये पटियाळा येथे गाडी पार्किंगच्या मुद्द्यावरून नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचा सहकारी यांचा गुरनामसिंग या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी वाद झाला होता. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. मारहाणीत गुरनामसिंग जबर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली होती. १९९९ मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी सिद्धूना निर्दोष मुक्त केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने २००६ मध्ये सिद्धू यांना तीन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
याननंतर, सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये १ हजार रुपयांचा दंड ठोठावून सिद्धूना सोडून दिले होते. मात्र, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठाने याप्रकरणाची पुनर्विचार याचिका स्वीकारली होती. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने माजी क्रिकेटपटू व काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना गुरुवारी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.