Narednra Modi On EVM : संसदेत एनडीएच्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे संसदीय नेतेपदी निवड झाली. या बैठकीत एनडीएमधील पक्षांनी नरेंद्र मोदींच्या यांच्या नावाच्या पंतप्रधान पदाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी यासाठी अनुमोदन केले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ईव्हीएमवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना नरेंद्र मोदी चांगलेच सुनावले. ईव्हीएम जिवंत आहे का असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की ते सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ईव्हीएम अजून जिवंत आहे का, कारण या लोकांनी भारतातील लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कमी करण्याचे ठरवले होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
"४ जूनला जेव्हा निकाल येत होते, त्यावेळी मी व्यस्त होतो. मग मला फोन येऊ लागले. मी कोणाला तरी विचारले की आकडे ठीक आहेत, पण ईव्हीएम ठीक आहेत का ते सांगा. हे लोक (विरोधक) भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. मला वाटले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएमची अंत्ययात्रा काढतील. मात्र ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील ५ वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही," असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
यावर डीके शिवकुमार यांना विचारले असता त्यांनी आम्ही पुरावे गोळा करत असल्याचे म्हटलं आहे. "नक्कीच, आम्ही उत्तर देऊ. आम्ही बरेच पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही पुरावे गोळा करू आणि तुमच्याकडे परत येऊ...," असे प्रत्युत्तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिलं आहे.