बंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचे सोमवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. कर्नाटकमधील मंगळुरू येथील रुग्णलयात उपचारादरम्यान ऑस्कर फर्नांडिस यांनी शेवटचा श्वास घेतला. (Congress leader Oscar Fernandes passes away)
गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्कर फर्नांडिस यांना डोक्याला दुखापत झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्या काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून मंगळुरूच्या येनेपॉय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ऑस्कर फर्नांडिस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. ते यूपीए सरकारमध्ये रस्ते परिवहन मंत्री राहिले होते. तसेच, ऑस्कर फर्नांडिस हे अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) च्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीसही होते. आता देखील ते राज्यसभेमध्ये खासदार होते.
1980 मध्ये कर्नाटकातील उडप्पी लोकसभा जागेवरुन ते खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 1996 पर्यंत ते सातत्याने निवडून आले होते. 1998 मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवले होते. तेव्हापासून ते राज्यसभा खासदार असताना संसदेचे सदस्य म्हणून राहिले होते.