भोपाळ - मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शर्मा यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तुलना ही भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासोबत केली आहे. तसेच 15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील असं देखील म्हटलं आहे. खराब रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा हे मंगळवारी (15 ऑक्टोबर) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील खराब रस्त्यांची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पीडब्लूडी मंत्री सज्जन सिंह वर्मा देखील उपस्थित होते. रत्यांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासोबत रस्त्याची तुलना केली आहे. तसेच शर्मा यांनी खराब रस्त्यांवरून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
'वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कसारखे रस्ते येथे तयार केले होते त्याचं काय झालं? पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे हे खड्डे झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आदेशानंतर 15 दिवसांत रस्ते नीट केले जातील. तसेच 15 ते 20 दिवसांत हेमा मालिनी यांच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील' असं पी सी शर्मा यांनी म्हटलं आहे.
2017 मध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'मी जेव्हा वॉशिंग्टन विमानतळावर उतरलो तेव्हा तेथील रस्त्यांवरून प्रवास करताना मला मध्य प्रदेशचे रस्ते अधिक चांगले असल्याची जाणीव झाली' असं म्हटलं होतं. त्यावरून आता पी सी शर्मा यांनी नाव न घेता चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वी इंदूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बॅटनं मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल कैलाश विजयवर्गीय यांना प्रश्न विचारण्यात आला. मारकुट्या मुलाबद्दल प्रश्न विचारल्यानं कैलाश विजयवर्गीय संतापले होते.