नवी दिल्ली: लडाखमध्ये LACवर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सांगितलं.
देशाचे जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये चीनविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे अनेक ठिकाणी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलन सुरु आहेत तर केंद्रानेही एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनाही चीनी उपकरणं न वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, भारतीय बाजारपेठांनी चिनी वस्तूंवर बंदी घातल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही. त्यामुळे बहिष्कार घाल्याऐवजी भारताने स्वयंपूर्ण होण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु याचा अर्थ उर्वरित जगाशी व्यापर संबंध तोडून टाकावेत असं होत नाही. तर भारताने चिनी उत्पादनांवर बंदी न घालता जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थान कायम ठेवले पाहिजे, असं मत पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षणासारखा संवेदनशील विषय हाताळताना आपण उत्पादनांवर बंदी आणण्याचा मुद्दा विचारात घेऊ नये असा सल्ला देखील पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला दिला आहे.
दरम्यान, आत्मनिर्भर भारत या माध्यमातून चीनची भारतीय बाजारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. कोणताही माल आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करण्यापेक्षा तो माल देशात बनवून त्याचा निर्यात केली जावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. चीन हा भारतीय बाजारपेठेतील मोठा गुंतवणूकदार आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. पण सध्याच्या काळात चीन आणि भारत यांच्यात तणाव असल्याने भारतीयांच्या मनात चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनसोबत कोणताही व्यवहार करु नये अशी भूमिका सर्वसामान्य लोकांची आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान
'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध
कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार