Congress dig PM Narendra Modi: मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असेलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रातील सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याची टीका सातत्याने काँग्रेसकडून करण्यात येत आहे. अशातच बुधवारी बॉलीवूडमधील लोकप्रिय कपूर कुटुंबासोबत झालेल्या भेटीवरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिग्गज अभिनेते राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी कपूर कुटुंबाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावरुन काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबीयांच्या भेटीवरुन समाचार घेतला आहे. 'आम्ही मणिपूर म्हटलं, त्यांना करीना कपूर वाटलं' असा टोला काँग्रेस नेते पवन खेडा यांनी लगावला आहे. मात्र काही वेळाने पवन खेरा यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
१४ डिसेंबर हा राज कपूर यांचा १००वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी कपूर कुटुंबियांनी पंतप्रधानांना त्याचे निमंत्रण दिले आहे.
त्यामुळेच ११ डिसेंबर रोजी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा तसेच कपूर कुटुंबातील इतर सदस्यांनी राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या काळात राज कपूर यांचे चित्रपट ४० शहरे आणि १३५ चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहेत.
दरम्यान, कपूर कुटुंबियांच्या भेटीबद्दल काँग्रेसने केलेली टीका वर्षभरापासून मणिूपरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन आहे. एक वर्षापासून जातीय हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदींनी जाणिवपूर्वक भेट देण्याचे टाळल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात अजूनही हिंसाचार सुरूच आहे.