नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होणाऱ्या दरवाढीवरून आता राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress leader priyanka gandhi criticized modi government over fuel price hike)
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एक ट्विट करत मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे.
महागाईचा विकास
दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे.
महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते; बिहारमधील मंत्र्याचे अजब तर्कट
केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. सलग अकरा दिवस किमती वाढल्या आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती UPA सरकारच्या कार्यकाळापेक्षा अर्ध्यावर आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर गेले आहेत, असे अशोक गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दरम्यान, गेले सलग अकरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. या दरवाढीने दिल्लीत पेट्रोलने ९० रुपयांची तर डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. मुंबईत साधे पेट्रोल ९७ रुपयांच्या नजीक गेले आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा इंधन दरवाढीचा धडका कायम आहे.