"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:19 PM2024-08-24T17:19:36+5:302024-08-24T17:23:43+5:30

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Congress leader Priyanka Gandhi has objected to the bulldozer action in BJP ruled government | "न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

Priyanka Gandhi on Bulldozer Action : मध्य प्रदेशातील छतरपूर हिंसाचारानंतर प्रशासनाने मुख्य आरोपी शेहजाद अलीच्या १० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवला. या बुलडोझर कारवाईनंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची कारवाई थांबविण्याची मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याच्या कारवाईबाबत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी न्यायासाठी बुलडोझरचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे, असं म्हटलं आहे. वास्तविक, मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आरोपी असलेल्या व्यक्तीचे घर पाडण्यात आले. ज्याबाबत काँग्रेसने सवाल विचारला आहे.

"एखाद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असल्यास, केवळ न्यायालयच त्याचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ठरवू शकते. पण आरोप होताच आरोपीच्या कुटुंबीयांना शिक्षा करणे, डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायदा न पाळणे, न्यायालयाचा अवमान करणे, आरोप होताच आरोपीचे घर पाडणे. हा सगळा न्याय नाही. ही रानटीपणाची आणि अन्यायाची भूमिका आहे. कायदा बनवणारा, कायदा पाळणारा आणि कायदा मोडणारा यात फरक असला पाहिजे. सरकार गुन्हेगारांसारखे वागू शकत नाही. कायदा, संविधान, लोकशाही आणि मानवता यांचे पालन ही सुसंस्कृत समाजात राज्यकारभाराची किमान अट असते. जो राजधर्माचे पालन करू शकत नाही तो समाजाचे किंवा देशाचे भले करू शकत नाही. बुलडोझर न्याय पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे," असं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपशासित राज्यांवर निशाणा साधला. "एखाद्याचे घर पाडणे आणि त्याच्या कुटुंबाला बेघर करणे हे दोन्ही अमानवीय आणि अन्यायकारक आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य करणे अत्यंत त्रासदायक आहे. कायद्याचे राज्य असलेल्या समाजात अशा कारवायांना थारा नाही," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
 

Web Title: Congress leader Priyanka Gandhi has objected to the bulldozer action in BJP ruled government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.