काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांची तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचीभारत जोडो यात्रा लवकरच बिहारमधून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. प्रियंका यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
मी मोठ्या उत्साहाने भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये यायची वाट पाहत होती. परंतु आजारपणामुळे मला आजच हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले आहे. थोडे बरे वाटताच मी यात्रेत सहभागी होईन. तोपर्यंत चंदौली-वाराणसीला पोहोचत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, खूप कष्ट करून यात्रेची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या माझ्या सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देते, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून शुक्रवारी म्हणजे आजच सायंकाळी उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. 16 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पूर्व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांतून रायबरेली आणि अमेठीमध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे. 22 आणि 23 फेब्रुवारी हे यात्रेसाठी विश्रांतीचे दिवस आहेत आणि 24 फेब्रुवारीला यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.