नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Congress Priyanka Gandhi) यांनी भाजपाने केलेल्या एका आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो" असं म्हटलं आहे. भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाने केलेल्या गंभीर आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देत "आमच्यात मतभेद कुठे आहेत?"असा सवाल देखील त्यांनी केला आहे. याच वेळी प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. "संघर्ष योगीजींच्या डोक्यात सुरू आहे. भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यातील मतभेदांवरून योगी आदित्यनाथ असं बोलत आहे" अशी जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 'उन्नती विधान जन घोषणा पत्र-2022' या नावाने पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे असं म्हटलं होतं. तसेच हा खर्या अर्थाने जाहीरनामा असल्याचे सांगत या माध्यमातून जनतेच्या आकांक्षा काय आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी काय करणार आहे? हे मला सांगायचे आहे. आम्ही जो जाहीरनामा जारी केला आहे, त्यात नोंदवलेल्या गोष्टी या सर्वसामान्यांच्या सूचना आहेत. राज्यातील जनतेशी चर्चा करूनच या सर्व सूचनांनुसार जाहीरनामा तयार केला आहे. राज्याचा विकास कसा केला जाईल, याबाबत आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिले आहे, असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं होतं.
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. तसेच, छत्तीसगडचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने शपथ घेतल्यानंतर तेथे 24 तासांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. याशिवाय भात आणि गहू 2500 रुपये प्रतिक्विंटल आणि ऊस 400 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याचबरोबर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वीजबिल निम्मे करण्याचे आणि कोरोनाच्या काळातील थकबाकी माफ करण्याचेही म्हटले आहे. याशिवाय, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकतील.