Priyanka Gandhi on bjp : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैगिंक छळाचा आरोप केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून पैलवानांनी आंदोलन थांबवले आहे. दिल्ली पोलिसांनी लैगिंक छळाच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा छळ केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधींनी ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. "महिलांवरील अत्याचाराच्या आरोपीला त्याच्या पदावरून हटवण्यात यावे, निष्पक्ष तपास व्हावा, अटक व्हावी आणि त्याला कायद्याच्या न्यायालयात शिक्षा व्हावी, असे कायदा आणि नैतिकता सांगते. मात्र, भाजपा सरकारमध्ये देशाचे नाव लौकिक मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? हे प्रकरण दडपले जात आहे, तपासात हे प्रकरण का दडपले जात आहे? यावर संपूर्ण सरकार गप्प का आहे? आरोपी अजूनही भाजपमध्ये का असून कारवाई का झाली नाही?", असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, २३ एप्रिलपासून जवळपास दीड महिने पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला देशातील विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आखाड्याबाहेरील कुस्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले की, आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारे ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग यांसारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि शिक्षा देखील होऊ शकते.