नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. भारतात आता लोकशाही राहिली आहे की नाही? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे. जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरून प्रियंका यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 'गेल्या 6 महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय बंदिस्त करण्यात आलं आहे. लाखो लोकंही तिथं अडकली आहेत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही हे सगळं किती दिवस चालणार हे विचारत होतो? मात्र भारतात आता लोकशाही राहिली आहे की नाही?' असं ट्विट प्रियंका यांनी केलं आहे.
5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. तसेच काही नेत्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील काही नेत्यांची सुटका करण्यात आली होती. मात्र फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना अद्यापही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा सरकारवर निशाणा साधला होता. किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. महागाईवरूनप्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारने जनतेचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारली असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. 'भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठाचे दरही वाढले असल्याने गरिबांनी काय खायचं? मंदीमुळे लोकांना कामही मिळत नाही आहे' असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा
राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन
नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!
जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत