"केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू मात्र ते हे विसरले आहेत की...", प्रियंका गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:45 PM2021-01-31T17:45:55+5:302021-01-31T17:50:31+5:30

Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

congress leader priyanka gandhi slams bjp government over farmers protest | "केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू मात्र ते हे विसरले आहेत की...", प्रियंका गांधींचा घणाघात

"केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू मात्र ते हे विसरले आहेत की...", प्रियंका गांधींचा घणाघात

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्याने शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असल्यावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते हे विसरले आहेत की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठतील" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा सरकारद्वारे पत्रकार व लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना धमकावण्याचा प्रकार अत्यंत भयानक आहे. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर ती सरकारची जबाबदारी देखील आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी "भाजपा सरकारने वरिष्ठ पत्रकार व लोक प्रतिनिधींना धमकावण्यासाठी गुन्हे दाखल करून, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करण्यासारखं आहे" असं देखील म्हटलं आहे. याआधीही प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत असं म्हटलं होतं. 

"जगातील कोणतंही आंदोलन दडपून किंवा चिरडून शांत करता येत नाही"

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांनी मिळून तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. जगातील कोणतंही आंदोलन दडपून किंवा चिरडून शांत करता येत नाही असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान मलिक यांनी आता आंदोलनाबाबत मोठं विधान केलं आहे. "मी स्वत: शेतकरी आंदोलनातून पुढे आलो आहे. म्हणून मी त्यांच्या समस्या समजू शकतो. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणं देशाच्या हिताचं आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घ्यावी, असं माझं सरकारला आवाहन आहे. दोन्ही बाजूंनी जबाबदारीने चर्चेत सहभागी झालं पाहिजे" असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. 

"जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो"

दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेलं नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे" असं सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


 

Web Title: congress leader priyanka gandhi slams bjp government over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.