नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशातील एका महिलापोलिसाने आपला गळा दाबला, तसेच आपणास धक्का देऊन खाली पाडले, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला होता. या आरोपानंतर प्रियांका गांधी चर्चेत असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांनी एक ट्विट केले आहे. मात्र प्रियांका गांधी यांनी केलेल्या ट्विटचा नेमका अर्थ समजत नसल्याने सोशल मीडियावर त्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रियांका गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै असं दुर्गा सप्तशतीचा मंत्र ट्विट केलं आहे. मात्र या मंत्राद्वारे प्रियांका गांधी यांना नक्की काय म्हणायचे आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
प्रियांका गांधींचे ट्विट नेटकऱ्यांनी रिट्विट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये एका युजर्सने हा मंत्र नारी शक्तीचं प्रतीक असून समजणाऱ्यांना इशारा पुरेसा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना विनाकारण अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी जात होते. काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून मी बाहेर पडले. लोहिया चौकात आम्हाला पोलिसांनी अडवले. मी गाडीतून उतरून पायी चालू लागले, तेव्हा मला पोलिसांनी घेरले. एका महिला पोलिसाने माझा गळा दाबला. मला धक्का दिला. त्यामुळे मी पडले. पुढे गेल्यानंतर मला पुन्हा पकडण्यात आले. मी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून जाऊ लागले, तेव्हा त्यालाही पाडण्यात आले असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता.