प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात; चार वाहने एकमेकांना धडकली
By देवेश फडके | Published: February 4, 2021 10:19 AM2021-02-04T10:19:40+5:302021-02-04T10:21:34+5:30
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला हापूड येथे अपघात झाला. ताफ्यातील चार वाहनांची एकमेकांत धडक झाली, अशी माहिती मिळाली आहे.
रामपूर :काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला हापूड येथे अपघात झाला. ताफ्यातील चार वाहनांची एकमेकांत धडक झाली, अशी माहिती मिळाली आहे. गढ गंगा येथील टोल प्लाझाजवळ हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातानंतर ताफ्यातील सर्वजण सुखरुप आहेत.
प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रामपूरयेथे जात होत्या. यावेळी त्या राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) नेते जयंत चौधरीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यासाठी प्रियंका गांधी यांचा ताफा गढमुक्तेश्वर मार्गे गजरौला येथून रामपूर येथे जात होता. मात्र, गढ गंगा येथील टोल प्लाझाजवळ या ताफ्याला अपघात झाला. मीडिया रिपोर्टनुसार, एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, नवरीत सिंग यांचा अखेरचा 'अरदास' कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांतवन करणार आहेत.
ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालातही, नवरीत सिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हणण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी प्रियंका गांधी यांचा ताफा दिल्लीहून निघाला. याच ताफ्यात उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंह देखील उपस्थित आहेत. तसेच प्रियांका गांधी समर्थकदेखील त्यांच्यासोबत जात आहेत. NH-24 मार्गाने प्रियांका गांधी यूपीतील रामपूर येथे जात आहेत.