लखनऊ : काँग्रेसनेउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 'उन्नती विधान जन घोषणा पत्र-2022' या नावाने पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी हा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे.
हा खर्या अर्थाने जाहीरनामा असल्याचे सांगत या माध्यमातून जनतेच्या आकांक्षा काय आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी काय करणार आहे? हे मला सांगायचे आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच, 'आम्ही जो जाहीरनामा जारी केला आहे, त्यात नोंदवलेल्या गोष्टी या सर्वसामान्यांच्या सूचना आहेत. राज्यातील जनतेशी चर्चा करूनच या सर्व सूचनांनुसार जाहीरनामा तयार केला आहे. राज्याचा विकास कसा केला जाईल, याबाबत आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिले आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. तसेच, छत्तीसगडचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने शपथ घेतल्यानंतर तेथे 24 तासांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. याशिवाय भात आणि गहू 2500 रुपये प्रतिक्विंटल आणि ऊस 400 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
याचबरोबर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वीजबिल निम्मे करण्याचे आणि कोरोनाच्या काळातील थकबाकी माफ करण्याचेही म्हटले आहे. याशिवाय, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकतील.
20 लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनकाँग्रेसनेही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात रोजगाराबाबत मोठे आश्वासन दिले आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार, काँग्रेसची सत्ता आल्यावर 20 लाख लोकांना रोजगार दिला जाईल. प्रियंका गांधी म्हणाल्या की, सत्तेत आल्यानंतर पोलीस, आरोग्य सेवा आणि शिक्षण विभागांसह सार्वजनिक क्षेत्रातील इतर विभागांमध्ये 12 लाखांचा मोठा बॅकलॉग भरून काढला जाईल. याशिवाय, आणखी 8 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यासोबतच कंत्राटी कामगारांना (Contract Workers) टप्प्याटप्प्याने कायम करण्याचे आश्वासनही काँग्रेस प्रियंका गांधी यांनी दिले आहे.
शालेय स्वयंपाकींच्या पगाराबाबतही महत्त्वाची घोषणाशालेय स्वयंपाकींच्या पगाराबाबतही काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस सत्तेत आल्यास शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्यांचे वेतन दरमहा 5 हजार रुपये केले जाईल. यासोबतच एडहॉक आणि शिक्षामित्रांना त्यांचा अनुभव आणि नियमांच्या आधारे नियमित करण्यात येईल.