उत्तर प्रदेशात प्रियांका असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा; काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार सर्व जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 12:20 PM2021-08-05T12:20:56+5:302021-08-05T12:23:25+5:30
"काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही."
रायपूर - उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत. लोकांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. येथे पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
कोणत्याही पक्षाशी आघाडीसंदर्भात चर्चा नाही, पक्ष सर्व जागा लढणार -
राजेश तिवारी म्हणाले, काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये 15 वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर बूथ स्तरावर जोरदार यश मिळाले आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही प्रयोग केले जात आहेत, असेही तिवारी म्हणाले.
उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात; राहुल, प्रियांका गांधी यांचे टीकास्त्र
उत्तर प्रदेशातील 100 हून अधिक नेत्यांना छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण -
हे लक्षात घेण्यासारखे आहे, की उत्तर प्रदेशचे 100 हून अधिक अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना बूथ व्यवस्थापनापासून ते काँग्रेसच्या इतिहासापर्यंत माहिती दिली जात आहे. त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही प्रशिक्षण दिले.
राजेश तिवारी म्हणाले, रायपूरमधील निरंजन धर्मशाला येथे मास्टर ट्रेनर्सना बूथ व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. प्रियांका गांधीही बुधवारी सायंकाळी या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात व्हर्च्युअली सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रियंका यांनी आतापर्यंतच्या प्रशिक्षणाची माहिती घेतली. हे मास्टर ट्रेनर आता उत्तर प्रदेशातील जिल्हा, विधानसभा आणि ब्लॉक स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील.