भारताच्या सीमेवरील वादाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर खासदारांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून 'वॉकआऊट' केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) मुद्द्यावर चर्चेची मागणी बैठकीत केली, पण समितीच्या अध्यक्षांनी याची परवानगी दिली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बैठकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देखील भारतीय सुरक्षा दलाच्या गणवेशाच्या मुद्द्यावरुन आयोजित चर्चेतून राहुल गांधी यांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीत लष्कराच्या गणवेशाबाबत चर्चा केली जात होती. पण राहुल गांधींचं याबाबतचं मत वेगळं होतं. आपण राजकीय व्यक्ती असून लष्कराच्या गणवेशात बदल करण्याबाबत निर्णय आपण घेऊ नये. याचा सर्वस्वी निर्णय लष्कराकडून घेण्यात यावा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती.