आसामला RSSचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 04:11 PM2019-12-28T16:11:10+5:302019-12-28T16:12:38+5:30
राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्लाबोल केला.
गुवाहाटी : काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात आज देशभर विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्लाबोल केला.
"आम्ही भाजपा आणि आरएसएसला आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, तर आसामची जनताच चालविणार आहे", असे राहुल गांधी यांनी सांगत आरएसएसवर निशाणा साधला. याचबरोबर, राहुल गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. आसामच्या जनतेला लढवायचे...भारतातील जनतेला लढवायचे...ज्या ठिकाणी जातील, त्याठिकाणी फक्त द्वेष पसरवत आहेत. मात्र, आसामची जनता द्वेषाने किंवा रागाने पुढे जाणार नाही. तर प्रमाने पुढे जाणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
#WATCH Rahul Gandhi in Guwahati: Hum BJP aur RSS ko Assam ki history, bhasha ,sanskriti par akraman nahi karne denge. Assam ko Nagpur nahi chalayega, Assam ko RSS ke chaddi wale nahi chalayenge. Assam ko Assam ki janta chalayegi. pic.twitter.com/hzg4qaPRPv
— ANI (@ANI) December 28, 2019
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या विरोधी पक्षांवरही निशाणा साधला.
उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.
प्रियंका गांधी म्हणाले, "आज देश संकटात आहे. आम्ही विविध राज्यात हिंसाचार झाल्याचे पाहिले. विद्यार्थी आणि तरूण आपला आवाज उठवत आहेत. मात्र, सरकार त्यांची गम्मत करत आहे. भीतीचे वातावरण तयार करत आहे. तरूणांना मारले जात आहे. आज आम्ही एका विचारधारेसोबत लढत आहोत. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यांत काहीच भूमिका नव्हती."
#WATCH Man breaches security of Priyanka Gandhi Vadra at a party event in Lucknow on Congress foundation day, gets to meet her. pic.twitter.com/v4UtwedMF2
— ANI UP (@ANINewsUP) December 28, 2019
दरम्यान, सीएए आणि एनआरसीला ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार विरोध होत आहे. तिथे या कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण नंतर देशभरात पसरले होते. उत्तर प्रदेश, दिल्लीसह काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळणही लागले.