नवी दिल्ली - देशात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन केला आहे. यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर, सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद पारपडल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी सरकारचे कौतुक केले आहे. ‘आज सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज म्हणजे, सरकारने योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचे भारतावर ऋण आहे,’ असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरिबांना, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यात टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा यामागील उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.