मुंबईमधील शिवाजी पार्क येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होत आहे. या सभेला विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शिवाजी पार्क येथील सभास्थळी दाखल झाले आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जात अभिवादन केलं. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्यासुद्धा उपस्थित होत्या.
भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा शिवाजी पार्कवर होणार असल्याने येथे येणारे राहुल गांधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, राहुल गांधी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार संध्याकाळी सभास्थळी आल्यावर राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आदी नेते उपस्थित आहेत.