नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमावादावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. (Budget 2021 Latest News)
राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर भारत-चीन सीमावादावरून टीका केली आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे. आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. पीआरसाठी पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यांच्याबरोबर फोटो काढतात. असे असताना संरक्षणाचे बजेट वाढवले का जात नाही? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी किती तरतूद?
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ४.७८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रातील बजेटमध्ये सात हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी संरक्षणासाठी ४.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
Budget 2021 गरिबांच्या हातात काहीच नाही; देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हाती: राहुल गांधी
राहुल गांधींची अर्थसंकल्पावर टीका
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा जोरदार टीका केली. गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
भारत-चीन सीमेवर पुन्हा झटापट
भारत-चीन सीमेवर अलीकडेच पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यावरून अद्यापही लडाख सीमेवर अशांतता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी तसेच सैन्य पातळीवर नऊ बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. पँगाँग सरोवराच्या फिंगर फोरमधून चीन माघार घ्यायला तयार नाहीय. तोचा वादाचा मुख्य मुद्दा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापासून चीनने पूर्व लडाख सीमेवरील काही भागांमध्ये अतिक्रमण केले आहे. यावरून भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष झाला. मात्र, भारताच्या शूर जवानांनी चीनचे आव्हान तितक्याच ताकदीने परतवून लावले.