नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमावाद वाढत असताना, दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकारनं ५९ चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर आकडेवारीसह निशाणा साधला आहे. २०१४ पासून देशात ड्रॅगन कसा वाढला, याची माहिती राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. मोदी सरकारनं काल चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना राहुल यांनी गेल्या सहा वर्षांत चीनमधून होणारी आयात कशी वाढली, याची आकडेवारी ट्विट केली. 'आकडे खोटं बोलत नाहीत. भाजप म्हणतो मेक इन इंडिया. पण असं म्हणून ते चीनकडून खरेदी करतात,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चीनकडून होणारी आयात यांची तुलना राहुल यांनी केली आहे.
२०१४ नंतर देशात 'असा' वाढला ड्रॅगन; राहुल गांधींकडून आकडेवारी शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:19 PM