नवी दिल्लीराजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या वेशीवर गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाला बळाच्या जोरावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोटोत एक जवान शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो अतिशय दुर्दैवी फोटो असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. ''आपण आजवर जय जवान, जय किसान असा नारा ऐकत आलो आहोत. पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान आणि किसान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. हे खूप धोकादायक आहे'', असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर कालपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रू धुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या सगळ्याला न जुमानता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.
...ही तर फक्त सुरुवात, शेतकऱ्यांना कुणीच रोखू शकत नाही: राहुल गांधी
दरम्यान, राहुल यांनी शुक्रवारीही एक ट्विट करुन शेतकऱ्यांना पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. अहंकार कधीच सत्यावर मात करू शकत नाही हे मोदींनी लक्षात ठेवायला हवं. सत्याचा लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना जगातील कोणतंच सरकार रोखू शकत नाही. मोदींना काळे कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ही तर फक्त सुरुवात आहे, असं ट्विट राहुल यांनी केलं होतं.