लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात जागावाटपावरून राजकारण तापलं आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला 11 जागा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसचे म्हणणे आहे की सध्या जागावाटपाबाबत कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाही. याच दरम्यान, अखिलेश यांनी समाजवादी पक्षाच्या 16 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, "अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र आम्हाला निमंत्रणही मिळत नाही. अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या घटना घडतात. पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही. मग आम्ही स्वतःहून निमंत्रण कसं मागायचं?"
सपा आणि रालोद यांच्यात काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीअंतर्गत जागांचे वाटप झाले होते. रालोद उत्तर प्रदेशमध्ये 7 जागा लढविणार आहे. काँग्रेस 11 आणि रालोद 7 अशा 18 जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा 62 जागांवर निवडणूक लढणार आहे.
काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 23 जागा लढवायच्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी एकट्याने निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यानंतर आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबमध्ये तसे संकेत दिले होते. बिहारमध्ये नितीश कुमारच भाजपासोबत जात असल्याने काँग्रेसवर मोठा दबाव आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे.