नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन टप्प्यांत यांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात मध्यम लघु आणि कुटीर उद्योगांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली. तर आज दुपासी दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजूर आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीचे पेटारे खुले केले. मात्र, यावरून आता राजकारणही तापू लागले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांचा एक मार्मिक व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे, की 'अंधकार गडद आहे, कठीन परिस्थिती आहे, हिम्मत ठेवा-आम्ही या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी उभे आहोत. सरकारपर्यंत यांच्या किंकाळ्या पोहोचूनच राहू, यांच्या हक्काची प्रत्येक मदत देऊनच राहू. देशातील सामान्य जनता नाही. हे तर देशाच्या स्वाभिमानाचा ध्वज आहे... तो कधीही झुकू देणार नाही.'
आणखी वाचा - आजचा दिवस शेतकरी अन् प्रवासी मजुरांचा; 'या' आहेत आर्थिक पॅकेजमधील महत्वाच्या घोषणा
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनीही आर्थिक पॅकेजवरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेजसंदर्भात दुसऱ्या दिवशी केलेल्या घोषणांचा अर्थ - “खोदा पहाड, निकला जुमला”, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. त्यांनी हे आर्थिक पॅकेज म्हणजे जुमला असल्याचे म्हटले आहे.
स्थलांतरित मजुरांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा -अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी, शेतकरी आणि स्थलांतरित मजूर आणि रस्त्यांवरील विक्रित्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. शहरात राहणारे गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 11 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच, स्थलांतरित मजुरांच्या राहण्याची आणि अन्न-पाण्याची योग्य व्यवस्था करावी, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : बिल गेट्स यांचा धक्कादायक खुलासा; 2016मध्येच ट्रम्प यांना दिला होता महामारीचा इशारा
8 कोटी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यापर्यंत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य. तसेच प्रत्येक कुटुंबाला एक किलो चना दाळ दिली जाणार आहे. यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 23 राज्यांतील 67 कोटी लोकांना ‘एक राष्ट्र, एक राशन कार्ड’ योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा -निर्मला सीतारामन यांनी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा केली आहे. नाबार्डकडून या योजनेतील पैसे जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकाना दिले जातील. यानंतर या बँकांकडून अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा देशातील जवळपास ३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच याचा समन्वय राज्यसरकार साधतील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याचसोबत पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठीही योजना लवकरच आणणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा