नवी दिल्ली : देशात आताच्या घडीला बेरोजगारी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोकरी मागितल्यावर तरुणांना हे मोदी सरकार देशद्रोही ठरवत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. (congress leader rahul gandhi criticised modi govt over unemployment)
राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी #StudentsWantJobs या हॅशटॅगचा वापर करत विद्यार्थ्यांना नोकरी पाहिजे, मात्र सरकार पोलिसांच्या छड्या, वॉटर गनचा वापर, देशद्रोह्याचा शिक्का आणि बेरोजगारी देत आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नाही
स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेने लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी, भारत आता हा लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचे मोठे वक्तव्य केले. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून करत हा दावा केला.
ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी
दरम्यान, राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात २५ टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला. तर १० पैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.