नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कठीण काळात तयार करण्यात आला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली असून, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन, सरकारी योजना, धोरणे यांवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तर, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला.
हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका
यंदाच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन
यंदाचा अर्थसंकल्प असाधारण असून, यात विकासाचा विश्वास आहे. कोरोनाने संपूर्ण मानवजातीला हादरुन सोडले. त्यामुळेच, यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आत्मविश्वाला उजळणी देणारा असून जगभरात एक नवीन आत्मविश्वास वाढवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. तसेच, देशाला आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारा हा समतोल आणि देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.
सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत
या अर्थसंकल्पात रेल्वे, बँक, विमा, संरक्षण आणि स्टील या सर्वांची विक्री करण्याच्या तयारीत सरकार आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX असा सवाल सीपीएमचे नेते सलीम अली यांनी केला. तसेच त्यांनी या अर्थसंकल्पावर टीकाही केली. तर दुसरीकडे हा भांडवलदारांचा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत सीताराम येचुरी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.