सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार
By देवेश फडके | Published: February 7, 2021 12:28 PM2021-02-07T12:28:05+5:302021-02-07T12:30:35+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन ०२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Rahul Gandhi Criticized Central Government over Farmers Law)
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांचा आता गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प आहे. मोदी सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते, असे सांगत मोदी सरकारने अहंकार सोडावा. आंदोलक शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
किसान-मज़दूर के गाँधी जयंती तक आंदोलन के निर्णय से उनके दृढ़ संकल्प के साथ ही ये भी साफ़ है कि वे मोदी सरकार से कितने नाउम्मीद हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 7, 2021
अहंकार छोड़ो, सत्याग्रही किसानों की तकलीफ़ समझो और कृषि-विरोधी क़ानून वापस लो!
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीय कृषी कायद्यावरून टीका करत आहेत. काँग्रेसचा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांचे शांततेने सुरू असलेले आंदोलन देशहिताचे आहे. केंद्रीय कृषी कायदे केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर देशासाठी घातक आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता.
टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख
दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये या भागांमध्ये चक्का जाम आंदोलन केले गेले नाही. मात्र, उर्वरित देशभरात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरू, अमृतसर, संगरूर, जम्मू, पठाणकोट यांसारख्या अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलनात सक्रीय सहभागी होत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरले. शनिवारी दुपारी १२ ते ०३ या कालावधीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.