शिवसागर (आसाम) : ‘कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये कार्यरत आहे,’ अशी घणाघाती टीका ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.
शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. पदयात्रा नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर गांधींनी सत्ताधारी सरकारवर द्वेष पसरविणे आणि सार्वजनिक पैशांची लूट केल्याबद्दल टीका केली. “कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान आसामचे प्रश्न मांडू,” असे त्यांनी सांगितले.
सरकारी योजनेच्या अर्जाची रांग सोडून केले स्वागत राहुल गांधी दुपारच्या सुमारास जोरहाट जिल्ह्यातील मारियानी शहरात पोहोचले तेव्हा त्यांनी शेकडो ग्रामीण महिला सरकारी योजनेचे अर्ज मिळविण्यासाठी नाकाचारी भागातील सरकारी केंद्रात रांगेत उभ्या होत्या. गांधींचा ताफा तिथून जाताना पाहून त्या सर्व महिला रांग सोडून त्यांना भेटण्यासाठी रस्त्याकडे धावल्या. काफिला थांबला आणि गांधी बसमधून बाहेर येताच अनेक महिलांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला; पण, त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. नंतर महिलांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.