अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यावर आता विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर टीका केली. या मुद्द्यावरुन सोमवारी संसदेत गोंधळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन सरकारवर टीका केली.
"अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे, ते घाबरले आहेत. सरकारने चर्चा करावी. या चर्चेला संसदेत परवानगी दिली पाहिजे, अदानी यांच्यामागे कोणाची ताकद आहे, हे देशाला कळायला हवे, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की,"मी सरकारबद्दल खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे की 'हम दो, हमारे दो'. आता मोदीजी अदानीजींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आम्ही हा मुद्दा मी २-३ वर्षांपासून मांडतोय. दुध का दूध पानी का पानी व्हावे. लाखो कोटींच्या भ्रष्टाचारावर चर्चा व्हायला हवी.
काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर अदानी समूहावर झालेल्या आरोपांबाबत निदर्शने केली. विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
... म्हणून अदानी समुहाने ५४५४ कोटी रुपयांचे टेंडर गमावले; रेसमध्ये सर्वात पुढं होते अदानी
या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे, अशी काँग्रेसने मागणी केली आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल प्रसिद्ध केला असून अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.