- हरिश गुप्तानवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी सुमारे दोन महिन्यांपासून व्यग्र आहेत. राजस्थानमधील निवडणुका २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. मात्र, ते राजस्थानऐवजी तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांत प्रचार दौरे करत आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराची आपल्या मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा व्हावी, अशी इच्छा आहे. राजस्थाननंतर तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात त्यांनी तीन दिवस प्रचार दौरा केला.
राजस्थानमध्ये ते दौरा का करत नाहीत यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला तर मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन राज्यांत प्रचार संपताच राहुल गांधी १५ नोव्हेंबरनंतर राजस्थानमध्ये प्रचारासाठी जातील. राजस्थाननंतर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला निवडणुका असून, राहुल गांधी तिथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी असे का केले, याबद्दल काँग्रेसने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रियांका गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने राहुल गांधी यांनी विविध प्रसंगी तेलंगणात आणखी तीन दिवस मुक्काम केला होता. राहुल गांधी पंजाबमधील सुवर्ण मंदिरात गेले होते. त्यात त्यांनी दोन दिवस व्यतित केले. उत्तराखंडमधील केदारनाथचेही त्यांनी दर्शन घेतले. या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी त्यांनी तीन दिवस राखून ठेवले होते.
अशोक गेहलोत यांच्यावर नाराज?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर राहुल गांधी खूप नाराज असल्याचा दावा करण्यात आला. पक्षश्रेष्ठींचे आदेश गेहलोत यांनी डावलल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यमान २५ आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असे गेहलोत सांगत होते. पण, त्यांनी निष्ठावान असलेल्या व पराभूत होण्याची शक्यता असलेल्यांना पुन्हा तिकीट दिले. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होणार असे राहुल गांधी यांचे मत आहे. त्यामुळे तिथे प्रचार करून शक्ती वाया घालविण्यापेक्षा त्यांनी अन्य राज्यांत प्रचाराला जाणे पसंत केले असावे.