Rahul Gandhi On Manipur Violence | नवी दिल्ली : मणिपूरमधील सद्य स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मागील जवळपास दोन महिन्यांपासून दंगली, जाळपोळ आणि हत्या यामुळे मणिपूरने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थिती पाहता केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ जून रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या संदर्भात बुधवारी गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले, "मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. खुद्द पंतप्रधान देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांसाठी ही बैठक महत्त्वाची नाही, हे स्पष्ट आहे."
मणिपूरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची केली होती मागणीखरं तर आठवडाभरापूर्वीही राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता आणि राज्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी केली होती. १५ जून रोजी राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ जळत राहावे लागले, ज्यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. पंतप्रधानांचे हे अपयश असून ते गप्प आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे. द्वेषाचा हा बाजार बंद करू आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान खोलूया."