देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या रिक्त पदांचा दाखला देत सरकारला खडेबोल सुनावले. खरं तर रेल्वे मंत्रालयाने ५ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वेत पाच वर्षांनी भरती होत असून जागा कमी करण्यात आल्या आहेत, असे धोरण कुणाच्या फायद्यासाठी केले जात आहे? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.
रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलटच्या (ALP) ५६९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी म्हणाले की, देशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मोठी फसवणूक झाली. जे सामान्य कुटुंबातून आले आहेत आणि १८-१८ तास मेहनत करतात, अशा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. ही मुले लहान भाड्याच्या खोलीत राहतात आणि मोठी स्वप्ने पाहतात. रेल्वेने पाच वर्षांनंतर ५६९६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांवर अन्याय होत आहे.
तसेच रेल्वेतील नोकर भरती कमी करण्याचे धोरण कोणाच्या फायद्यासाठी राबवले जात आहे? दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन कुठे गेले? रेल्वेचे खासगीकरण न करण्याचे आश्वासन कुठे गेले? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मोदींची गॅरंटी ही तरुणांसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही राहुल गांधींनी नमूद केले.
रेल्वेने भरतीसाठी अर्ज मागवले असले तरी अत्यंत कमी जागा असल्याचा दाखला देत राहुल गांधींनी निशाणा साधला. "एकीकडे रेल्वेत लाखो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता केवळ ५६९६ पदांसाठी भरती होत असून हा तरूणांवर अन्याय आहे. रेल्वेत भरती कमी का केली जात आहे, कोणाच्या फायद्यासाठी भरती कमी करण्याचे हे धोरण आखले जात आहे, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.