"मोदी, भाजपला घाबरत नाही, ते मला हात लावू शकत नाहीत"; राहुल गांधी बरसले
By देवेश फडके | Published: January 19, 2021 04:08 PM2021-01-19T16:08:28+5:302021-01-19T16:11:37+5:30
केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नवी दिल्ली : मी देशभक्त आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपला घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाहीत, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो. भाजपच्या जेपी नड्डा यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. केवळ शेतकरी आणइ देशाच्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
LIVE: Special Congress Party Briefing by Shri @RahulGandhihttps://t.co/aa1mlJQZVl
— Congress (@INCIndia) January 19, 2021
मोदी सरकार हळूहळू संपूर्ण देशभरातील शेती आपल्या तीन ते चार मित्रांच्या हवाली करण्यासाठी प्रयत्न करत असून, हा त्यांचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. संपूर्ण देश विरोधात गेला तरी, सत्याच्या बाजूने मी नेहमी लढत राहीन. माझे चारित्र्य स्वच्छ आहे. नरेंद्र मोदी किंवा भाजपला मी घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाही. मात्र, गोळ्या घालू शकतात, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
मोदी सरकार शेतकऱ्यांना थकवू शकते. मात्र, मूर्ख बनवू शकत नाही. काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाचा सन्मान करते. परंतु, सरकारविरोधात कोणी बोलले, तर त्यांना थेट देशद्रोही ठरवले जाते. सत्ताधारी मात्र बोलताना कसलाही विचार करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच तशी शिकवण आहे. असे असले, तरी बोलण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
चीनकडे स्ट्रॅटेजिक व्हिजन आहे. मात्र, भारताकडे त्याचाच नेमका अभाव आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर चीनचा इशारा स्पष्टपणे समजतो. चीनला वेळीच धडा शिकवला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.