काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील संस्था फ्रीडम हाऊसनं लोकशाही असलेल्या देशांचा अहवाल सादर केला होता. यामध्ये भारताच्या क्रमांकात घसरण झाली होती. त्यानंतर आता स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेनं लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता भारत हा लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून करत हे वक्तव्य केलं. राहुल गांधी यांनी जो स्क्रिनशॉट शेअर केला आहे त्यात व्ही-डेमोक्रसीद्वारे (व्हरायटी ऑफ डेमोक्रसी) जारी केलेल्या एका रिपोर्टचा हवाला दिला आहे. यामध्ये भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे, जितका पाकिस्तान आहे, असं नमूद केलं आहे. तसंच या रिपोर्टमध्ये भारत हा बांगलादेशपेक्षाही खराब असल्याचं नमूद केलं आहे. अमेरिकेतील संस्था फ्रीडम हाऊसच्या अहवालाच्या एका आठवड्यानंतरच स्वीडनची संस्था व्ही-डेमोक्रसची अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी भारतातील लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी भारताला इलेक्टोरल ऑटोक्रेसी म्हणजेच निवडणूक हुकुमशाही असलेल्या देशांच्या यादीत सामील केलं आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या संस्थेनं सादर केलेल्या अहवालानंतर भारतानंही प्रतिक्रिया देत तो अहवाल चुकीचा आणि अयोग्य असल्याचं म्हटलं.