नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लडाख दौऱ्यावर गेले होते. नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलं आहे. तसेच भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दैरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी घुसखोरीविरोधात कृती करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. देशभक्त असलेले लडाखमधील नागरिक चिनी सैनिकांच्या घुसखोरीविरुद्ध आवाज उठवत आहे. त्यामुळे त्यांच्या या आवाजाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करु नये, त्या नागरिकांचे काय म्हणणे आहे हे ऐकायला हवे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही नागरिक चिनी घुसखोराबाबत बोलत आहे. तसेच चिनी सैनिकांची सुरु असलेली हालचालीचे काही फोटो देखील दाखवण्यात येत आहे. त्यामुळे लडाखच्या नागरिकांच्या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्ष केले तर महागात पडू शकते. केंद्र सरकारने भारतासाठी त्यांचे म्हणणे ऐकावे, असं आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही होते.
लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले.
देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.