नवी दिल्ली : काँग्रेसला अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड अध्यक्षपदासाठी झाली आहे. अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. २३ वर्षे काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांनी हे पद सोडले आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकाळाची आठवण करून त्यांचे अनुभव सांगितले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्याबद्दल भावनिक ट्विट केले आहे.
राहुल गांधींच्या ट्विटमध्ये सोनिया गांधी त्यांचे दिवंगत पती राजीव गांधी यांचा फोटो दिसत आहेत. "आई, आजीने मला एकदा सांगितले होते की, तिला तुझ्यासारखी मुलगी कधीच होऊ शकत नाही. ती अगदी बरोबर होती, मला तुझा मुलगा असल्याचा अभिमान आहे.", असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
गांधी कुटुंबाला धक्का, दोन संस्थांचे परवाने रद्द! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा
सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांची मुलगी प्रियांका गांधी यांनीही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. "...जग काहीही म्हणो किंवा विचार करो, मला माहित आहे, तू हे सर्व प्रेमासाठी केलेस." प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधींचा एक फोटो पोस्ट केला, यामध्ये दिवंगत राजीव गांधी यांचा फोटो दिसत आहे.
अध्यक्षपदाची सूत्र खर्गे यांच्याकडे दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेतृत्वाचीही मोठी जबाबदारी असल्याने मला दिलासा मिळाला आहे. मला मिळालेले प्रेम आणि आदर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेन आणि स्वीकारेन, पण हा सन्मान देखील खूप मोठी जबाबदारी होती. आज या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. त्यामुळे साहजिकच मला दिलासा मिळाला आहे.", असं सोनिया गांधी म्हणाल्या.