नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनासह गॅसच्या किमतीही वाढत आहेत. महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. (congress leader rahul gandhi slams modi government over fuel price hike)
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर देशाभरातील विविध मुद्द्यांवरून टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकारवर टीका केली. 'महागाईचा विकास', या दोनच शब्दांच्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या ट्विटसोबत वेगवेगळ्या हेडलाइन्स असलेला एक फोटोही शेअर केला आहे.
'शुभ दिन' म्हणून घोषित करावा
दुसरीकडे, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वाढलेल्या इंधनदरवाढीचा एक फोटो शेअर केला आहे. ''संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजप सरकारने 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा'', असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी हे 'महंगे दिन' ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे.
महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते
महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. सामान्य जनता गाडी घेऊन नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झालेली नाही, असा दावा बिहारचे पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांनी केला आहे.
इंधनदरवाढ होणार नाही, तो दिवस 'शुभ दिन' म्हणून घोषित करावा: प्रियंका गांधी
दरम्यान, सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे.