मलप्पुरम : अंकिता भंडारी हत्याकांडावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारवर निशाणा साधला आहे. अंकिता भंडारी हिची हत्या करण्याचे एकमेव कारण म्हणजे तिने वेश्या होण्यास नकार दिला होता, असे राहुल गांधी म्हणाले. केरळमधील मलप्पुरम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले.
याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, पंतप्रधानांचा नारा - बेटी बचाओ, भाजपचे कर्म - बलात्काऱ्याला वाचवा. ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, त्यांचा वारसा असेल - फक्त भाषणे, खोटी आणि पोकळ भाषणे. त्यांची राजवट गुन्हेगारांसाठी समर्पित आहे. आता भारत गप्प बसणार नाही.
याचबरोबर, उत्तराखंड सरकारने अंकिता हत्या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट केले. देवभूमीच्या कन्येला न्याय मिळवून देणे हा त्यांचा धर्म नाही का? सत्तेच्या लालसेने आंधळे झालेले धामी सरकार अखेर कोणाच्या संरक्षणासाठी आहे, भाजपशी निगडित अशा गुन्हेगारांच्या की अंकितासारख्या मुलींच्या? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातील गंगा भोगपूर येथील वंतरा रिसॉर्टमधील रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी ही तरुणी 18 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी 21 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे केली होती. यानंतर पौडीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 22 सप्टेंबर रोजी हे प्रकरण नियमित पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. नंतर अंकिताचा मृतदेह कालव्यात सापडला.
पोलिसांनी याप्रकरणी भाजपचे निलंबित नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्यसह तीन लोकांना अटक केली आहे. अंकिताची हत्या केल्याचा आरोप पुलकित आर्य याच्यावर आहे. विशेष बाब म्हणजे अंकिता जिथे काम करत होती, त्या रिसॉर्टचा संचालक हा पुलकित आर्यच होता. अंकिता बेपत्ता झाल्याचे समोर येताच रिसॉर्टचे संचालक आणि मॅनेजर फरार झाले होते.