भारत जोडो यात्रेदरम्यान मध्यप्रदेशातील आगर मालवा येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला. “त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही त्यांनी तिला बाहेर केलंय. ही मोठी गोष्ट मला मध्यप्रदेशातील एका पंडितजींनी क्सांगितलं. मी माझ्या आरएसएसच्या मित्रांना सांगू इच्छितो जय श्रीराम शिवाय जय सियाराम आणि हे राम याचाही वापर करा. सीताजींचा अपमान करु नका,” असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही सीतेचे स्मरण करतो आणि समाजात सीतेचे स्थान असायला हवे. जय सियाराम, जय सीताराम आणि तिसरं जय श्री राम.. यामध्ये आपण प्रभू रामाची स्तुती करतो,” असं राहुल गांधी म्हणाले.
'पंडितजी मला म्हणाले की तुम्ही तुमच्या भाषणात विचारा की भाजपवाले 'जय श्री राम' का म्हणतात. पण 'जय सियाराम' किंवा 'हे राम' का बोलत नाहीत? मला ते खूप आवडले. श्रीराम ज्या भावनेने जीवन जगले त्या भावनेने आरएसएस आणि भाजपचे लोक आपले जीवन जगत नाहीत. श्रीरामाने कोणावरही अन्याय केला नाही. समाजाला जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी सर्वांना आदर दिला. प्रभू रामाने शेतकरी, मजूर, व्यापारी, सर्वांना मदत केली. आरएसएसचे लोक आणि भाजपचे लोक प्रभू रामाची जी भावना होती, त्यांच्या जीवनपद्धती होती त्याचे पालन करत नाहीत,” असंही ते म्हणाले.“त्यांच्या संघटनेत एकही महिला नसल्याने ते जय सियाराम म्हणू शकत नाहीत. ही जय सियारामची संघटना नाही. स्त्रिया त्यांच्या संघटनेत येऊ शकत नाहीत. सीतेला त्यांनी बाहेर केलं आहे. मध्य प्रदेशातील एका पंडितजींनी मला रस्त्यात सांगितलेली ही खूप खोल गोष्ट आहे.”