भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आलं. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅमेरामध्ये टिपले. तसंच हा दिवस देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र मोदींवर निशाणा साधला.
चित्त्यांच्या भारतात येण्यावरूनही आता राजकारण सुरू झालं आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “आठ चित्ते तर आले, पण आता हे सांगा ८ वर्षांमध्ये १६ कोटी रोजगार का नाही आले?,” असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसनं शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणूनही साजरा केला.