काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी हरियाणातील शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात एक ट्विट केले आहे. यात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत सरकारला शेतकरी विरोधी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी, या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आणि रक्ताने माखलेल्या एका शेतकऱ्याचा फोटोही शेअर करत, "फिर खून बहाया है किसान का, शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का!" असे लिहिले आहे.
आज हरियाणातील कर्नाल येथे टोल प्लाझावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. कर्नालयेथे आज भाजपची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि भाजपचे आमदार आणि मंत्री ओपी धनखड पोहोचले होते. तर दुसरीकडे, शेतकरी बस्तारा टोल प्लाझावर बैठकीविरोधात एकत्र आले होते. येथेच आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक शेतकरी जखमी झाले.
मोदी सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत; तब्बल 43 कोटी लोकांना होणार फायदा
आंदोलक शेतकऱ्यांनी शुक्रवारीच भाजपच्या या बैठकीला आपला विरोध असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त लावला होता. बॅरिकेड्सदेखील लावण्यात आले होते. मात्र, असे असतानाही बस्तारा टोल प्लाझावर मोठ्या संख्येने शेतकरी जमून निदर्शन करत होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
यावेळ आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर हे शेतकरी महामार्गावरही जाऊन बसले. यानंतर पोलीस आणि शेतकरी टोल प्लाझावर आमने सामने आले आणि नंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.